Door Step School

‘पुस्तक परी’ घडवतेय अक्षरविश्‍वाची सफर – दै. सकाळ

(Click on image to read)

‘पुस्तक परी’ घडवतेय अक्षरविश्‍वाची सफर
– सुशांत सांगवे, सकाळ, पुणे
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2015

शालेय विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनाकडे वळावे, न अडखळता सलगपणे वाचावे, शब्दांचे उच्चार स्पष्ट करावेत, शब्दसंग्रह वाढवावा… यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत, अशी खंत शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्‍त करत आहेत; पण एक “पुस्तक परी‘ अशी आहे, जी की अनेक पऱ्यांना सोबत घेऊन मुलांना अक्षरविश्‍वाची सफर घडवून आणत आहे. मुलांमध्ये अवांतर वाचनाची गोडी वाढवत आहे. त्यामुळे कधी “बोक्‍या सातबंडे‘च्या तर कधी “छोटा भीम‘च्या दुनियेत मुले हरवून जात आहेत.

राजश्री जाधव असे या “पुस्तक परी‘चे नाव आहे. “डोअर स्टेप स्कूल‘च्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या “वाचन संस्कार प्रकल्पा‘च्या त्या प्रमुख आहेत. एक शिक्षिका म्हणून त्या काही वर्षांपूर्वी शाळेच्या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. कामाप्रती निष्ठा पाहून त्यांना वारंवार पदोन्नती मिळत गेली अन्‌ आज त्या उपसंचालक म्हणून संस्थेत कार्यरत आहेत. शिवाय, या प्रकल्पाच्या प्रमुखही आहेत. लग्नानंतर विभक्त राहणे, अशा स्थितीत मुलाला स्वत: सांभाळणे, घरच्या परिस्थितीला तोंड देत स्वत: शिकत-शिकत मुलालाही उच्च शिक्षणापर्यंत पोचविणे… या कौटुंबिक वादळांना अन्‌ आव्हानांना राजश्रीताईंनी तोंड दिले. तर दुसरीकडे, वाचन संस्कार प्रकल्पाला गती दिली. त्यामुळे अनेक मुलांमध्ये वाचनाचे संस्कार रुजण्यास मदत झाली. हे समजून घेताना स्त्री-शक्तीचे एक वेगळे दर्शन येथे आपल्याला पाहायला मिळते.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांसाठी “वाचन संस्कार प्रकल्प‘ राबविला जातो. पंधरा वर्षांपूर्वी हा उपक्रम दहा शाळांत सुरू झाला. आता 232 शाळांमध्ये सुरू आहे. वाड्या-वस्त्यांवरील शेकडो मुले-मुली आनंदाने यात सहभागी होतात. वाचन कसे करावे, जोडाक्षरे कशी म्हणावीत इथपासून अडखळायला लावणाऱ्या शब्दांचे अर्थ काय? हेही या वेळी मुलांना शिकवले जाते. त्यासाठी आता 320 शिक्षिका संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत. या शिक्षिकांना “पुस्तक परी‘ असे म्हटले जाते, असे राजश्रीताई सांगत होत्या.

वेगवेगळ्या साहित्य प्रकारांवरील जवळपास दीड लाख पुस्तके संस्थेकडे आहेत. पहिली ते चौथी आणि पुढे सातवीपर्यंतच्या मुलांना ही पुस्तके दिली जातात. पाचवीच्या पुढच्या मुलांना पुस्तके घरी नेऊन वाचण्यास सांगितले जाते. मुलांकडून-पालकांकडून कुठलाही मोबदला न घेता हा शब्दांचा पसारा मांडला जातो. यामुळे मुलांना वाचनाची गोडी वाढते. वाड्या-वस्त्यांवरील बहुतांश मुलांचे शिक्षण अर्धवट राहते. असे होऊ नये, ते वाईट मार्गाला लागू नयेत हाही यामागचा एक विचार आहे, असे त्यांनी सांगितले. राजश्रीताईंना संस्थेच्या या प्रकल्पाची माहिती इजिप्तमध्ये जाऊन देण्याची संधी मिळाली होती. मुळात राजश्रीताई या कार्यात आल्या त्या रजनीताई परांजपे यांच्यामुळे. त्या “डोअर स्टेप स्कूल‘च्या प्रमुख आहेत. त्यांच्याबद्दलही राजश्रीताई आदराने, भरभरून बोलत होत्या. त्यांनी माझ्यावर विश्‍वास ठेवला, जबाबदारी टाकली म्हणूनच मी धडपड करू शकले, अशा भावना त्या व्यक्त करत होत्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *