सलाम या शिक्षकांना…!

प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात शिक्षकाचं स्थान खूप महत्त्वाचं असतं. पण ‘डोअर स्टेप स्कूल’च्या शिक्षिकांच्या कामाचं महत्त्व समजून घ्यायला ते प्रत्यक्षच बघितलं पाहिजे. त्यांची कामाच्या ठिकाणची परिस्थिती, त्या पार पाडत असलेल्या जबाबदा-या, आणि रोजच्या कामाचं स्वरुप समजून घ्यायचा आपण थोडा प्रयत्न करुया…

‘डोअर स्टेप स्कूल’च्या शिक्षिकांचं काम सुरु होतं घरोघरी जाऊन मुलांना गोळा करण्यापासून. एखाद्या तात्पुरत्या उभ्या केलेल्या शेडमधे ‘डोअर स्टेप स्कूल’चा वर्ग चालतो. ही झोपडीसारखी शाळा बिल्डरच्या परवानगीनं बांधकामाच्या साईटवरच उभारली जाते. बांधकामावर दिवसभर काम करणा-या मजुरांच्या मुलांकडे या वर्गातल्या शिक्षिका पूर्ण लक्ष देतात. या वर्गामधे पिण्याचं पाणी, बाथरुम, लाईट, किंवा खिडक्या वगैरेंसारख्या साध्या-साध्या सोयीही नसतील कदाचित… पण निदान डोक्यावर छप्पर तरी असतं. खरं तर, तेही असेलच याची खात्री नाही, कारण काही वेळा हा वर्ग उघड्यावरच एखाद्या झाडाखाली किंवा दुस-या कुठल्यातरी झोपडीच्या सावलीतही चालवला जातो. वर्ग कसाही असो, सगळ्यात आधी या शिक्षिका तिथं साफसफाई करतात आणि जमिनीवरच चटया अंथरुन बसायची सोय करतात. वर्गाच्या भिंती मुलांचं लक्ष वेधून घेणा-या रंगीत तक्त्यांनी आणि इतर मजेशीर गोष्टींनी भरलेल्या असतात.

एका वर्गात साधारण ३० ते ५० मुलं असतात. यामधे अगदी काही महिन्यांच्या तान्ह्या बाळांपासून १२ वर्षांच्या मुलांपर्यंत कुठल्याही वयाची मुलं-मुली असू शकतात. ३० किंवा त्यापेक्षा जास्त मुलांसाठी दोन तरी शिक्षिका असतात; अगदी छोट्या बाळांना सांभाळायला एक आणि इतर मोठ्या मुलांकडं लक्ष द्यायला एक. या मुलांच्या घरी बहुदा शिक्षणाचं काहीच वातावरण नसतं आणि चांगलं दिसणं – स्वच्छ राहणं याबद्दल त्यांना माहितीही नसते. मग या शिक्षिकांनाच स्वत: या मुलांना स्वच्छ करावं लागतं, तेव्हा कुठं या मुलांना कळतं की आपण किती नेटनेटके आणि छान दिसू शकतो. कुठंही रहात असली तरी मुलं ही मुलंच असतात, ती पटकन या चांगल्या गोष्टी शिकून घेतात आणि घरी जाऊन आईवडीलांनाही सांगतात. हळहळू शिक्षिकांच्या प्रयत्नांना यश मिळत जातं आणि ही मुलं स्वत:चं स्वत: आवरुन नीटनेटकी वर्गावर यायला लागतात.

शिक्षिका मोठ्यानं टाळ्या वाजवून मुलांना प्रार्थनेसाठी एकत्र आणतात – आणि प्रार्थनासुद्धा कसली? तर कितीही अडचणी आल्या तरी शाळेत जात राहण्याची मुलांची प्रतिज्ञा! त्यानंतर थोडासा व्यायाम केला जातो. गाऊन आणि नाचून व्यायामाचं महत्त्व सांगितलं जातं. या शिक्षिकांकडं एकाच वेळी अनेक गोष्टी करायचं कसब असावं लागतं. पहिल्यांदा तर त्यांना मुलांचे वेगवेगळे गट बनवावे लागतात, फक्त वयानुसार नव्हे तर त्यांच्या वाचन क्षमतेनुसारसुद्धा. मग त्यांना आपापल्या क्षमतेनुसार काहीतरी करायला दिलं जातं. यासाठी ‘डोअर स्टेप स्कूल’च्या शिक्षिकांनी स्वत: बनवलेली शैक्षणिक साधनं आणि खेळणी वापरली जातात. या शिक्षिकांना मुलांना शिकवण्याचं काम तर असतंच, पण त्याबरोबरच रडणा-या मुलांना शांत करणं, नाराज मुलांना हसवणं, आणि मुलांची आपसातली भांडणं सोडवणं, हीदेखील कामं तितकीच महत्त्वाची असतात. त्यानंतर ‘खाऊची सुट्टी’ होते, पण मुलं त्यासाठी वर्गाबाहेर जात नाहीत. उलट याच शिक्षिका त्यांना अन्न वाया घालवू नये, जेवताना खाली सांडू नये, चांगलं आणि पौष्टिक अन्न खावं, वगैरे गोष्टी शिकवत राहतात.

या मुलांपैकी शाळेत जाणा-या मुलांचा ‘घरचा अभ्यास’ पूर्ण करून घेणं आणि शाळेत वेळेवर पोचण्यासाठी त्यांना वेळेत तयार करणं हेसुद्धा काम या शिक्षिकाच करतात. बाकीच्या मुलांना मग चित्रं काढणं, कागदाच्या वस्तू बनवणं, वगैरे कामं दिली जातात. सकाळच्या शाळेत जाणारी मुलं तोपर्यंत परत येतात आणि या वर्गातल्या मुलांसोबत आनंदानं चित्रं काढायला लागतात, निरनिराळ्या वस्तू बनवण्यात सामील होतात..

यानंतर असतो गोष्टीचा तास, मग एखादा विज्ञानाचा किंवा भूगोलाचा किंवा सामान्य ज्ञानाचा उपक्रम, त्यानंतर शाळेतून दिलेला ‘होमवर्क’ करुन घेणं, थोडंसं बागकाम, वर्गात मुलांनी घातलेल्या पसा-याची आवराआवर, मग बाहेर खेळायला नेणं… अशी कामांची यादी वाढत जाते. या सगळ्याच्या मधे-मधे वर्गावर येणा-या पालकांशी बोलावं लागतं, त्यांच्या छोट्या-मोठ्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं द्यावी लागतात, आणि त्यांची काळजी व शंका दूर करून त्यांच्या मुलांसोबतचं काम सुरु ठेवावं लागतं. मुलांच्या शिक्षणात पालकांना सहभागी करून घेण्याची महत्त्वाची जबाबदारीही त्यांच्यावर असते. गरज पडल्यास बांधकाम साईटवरचे सुपरवायझर, ठेकेदार यांच्याशी बोलावंही लागतं. मुलांच्या सुरक्षिततेकडं विशेष लक्ष दिलं जातं. या पद्धतीनं तीस-तीस मुलं सांभाळणं म्हणजे चेष्टा आहे का?

या सगळ्या कामांच्या नोंदी ठेवणं हेदेखील एक स्वतंत्र कामच असतं. मुलांची हजेरी, आठवड्याभरात मुलं काय-काय शिकली, कुठली शैक्षणिक साधनं जास्त वापरली जातात, कुठली साधनं बनवावी लागतील, वर्गाला भेट देणा-या पाहुण्यांच्या नोंदी, आणि काय काय…

पण एवढं सगळं करुन या शिक्षिका तुम्हाला नेहमी हसताना दिसतील आणि तुम्ही कधीही त्यांना भेटलात तरी त्यांच्या मुलांचे काही ना काही किस्से तुम्हाला कौतुकानं ऐकवत राहतील. ‘त्यांच्या’ मुलांना शाळेतून मिळालेली बक्षिसं आणि पदकं त्या अभिमानानं वर्गात मांडून ठेवतील आणि कुठलीही ‘आई’ आपल्या मुलाबद्दल बोलेल तितक्याच प्रेमानं आणि गर्वानं त्या या मुलांबद्दल तुमच्याशी बोलतील!

तळपत्या उन्हात आणि धो-धो पावसात आपलं काम सुरुच ठेवणा-या या शिक्षिकांमधे सीमेवरच्या सैनिकांइतकी निष्ठा आणि जिद्द दिसते. ‘डोअर स्टेप स्कूल’मधे शिक्षिकेचं काम करणं हा बहुतेक जणींच्या आयुष्यातला घराबाहेर पडून काम करण्याचा पहिलाच अनुभव असतो. बहुतेक जणींच्या घरांमधे तर शाळा शिकलेल्या त्या पहिल्याच मुली असतात. आपलं काम त्या अभिमानानं करतात, शिक्षणाचं महत्त्व त्यांना मनापासून पटलेलं असतं, आणि शिक्षणामुळं आपल्याला मिळालेल्या संधींचा फायदा या मुलांनाही मिळवून देण्यासाठी त्या प्रामाणिक प्रयत्न करत असतात. कामातून त्यांचा आत्मविश्वास जसजसा वाढत जातो तसतशा त्या आणखी जबाबदा-या स्विकारण्यासाठी तयार होत जातात आणि यामधे शक्य त्या सर्व मार्गांनी ‘डोअर स्टेप स्कूल’ त्यांना प्रोत्साहन देत राहते. या शिक्षिकांपैकी काहीजणी अर्धवेळ अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन स्वत:चं शिक्षणही सुरु ठेवतात.

इतक्या कठीण परिस्थितीमधे इतकं कष्टाचं काम करत राहण्यामागं या शिक्षिकांची प्रेरणा काय असेल? त्यांना मिळणा-या पगारापुरती ती नक्कीच सीमित नाही. त्यांची खरी प्रेरणा आहे त्यांची स्वत:शी आणि समाजाशी असणारी बांधिलकी. आपल्या विद्यार्थ्यांच्या यशातच आपलं यश बघणा-या या शिक्षिकांना बहुतेक आपण या मुलांचं आयुष्य खरोखर बदलतोय – घडवतोय हे लक्षातही येत नसेल! जसे प्रत्यक्ष लढणारे सैनिकच युद्धाचे खरे ‘हिरो’ असतात, तशाच या शिक्षिका ख-या समाजसुधारक आहेत. या सगळ्यांना ईश्वर आणखी बळ देवो, याच ‘शिक्षक दिना’च्या मनापासून शुभेच्छा!

– अर्चना व्यवहारकर
(अर्चनाताई ‘डोअर स्टेप स्कूल’सोबत स्वयंसेवक म्हणून ब-याच वर्षांपासून काम करतात.)